कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल,असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच त्यांनी कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात माझ्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, इचलकरंजी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले, भूसंपादन समन्वयक विवेक काळे, राधानगरी – कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, भूसंपादन अधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे आदी उपस्थित होते.
यावेळी कसबा कागल येथील म्हाडा गृहप्रकल्पातील वन बीएचके सदनिकेच्या रकमेमध्ये कपात करणे, लिंगायत समाज कसबा सांगाव (बसवेश्वर मंदिर) जागेबाबत, केंबळी येथील वाटप झालेल्या गावठाण प्लॉटचा 7/12 करणे व कुंभार समाजातील भूमीहीन लोकांचे अतिक्रमण नियमित करणे, मालकी हक्काच्या जमीनी आदेशात दुरुस्ती करणे, मौजे पिंपळगाव खुर्द येथील जमीन एकत्रीकरण योजनेच्या नोंदी, आंबेओहोळ प्रकल्पातील संकलन दुरुस्तीची व अन्य प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे, दूधगंगा धरणाच्या धरणग्रस्तांना मोबदला देणे तसेच सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या कागल हद्दीतील प्रलंबित कामांबाबतचा आढावा घेतला. त्या त्या विषयाशी संबंधित प्रकरणांची माहिती घेऊन प्रलंबित सर्व प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळे व मालमत्तांची दर आकारणी रेडीरेकनरच्या दराने न करता जुन्या दराने करण्याची मागणी दुकान मालकांनी केली असता हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे या विषयाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
महसूल व अन्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व विषयांचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केल्या.
बैठकीला संबधित प्रकरणांशी संबधित नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.