शिवाजी विद्यापीठात १४ पासून दोनदिवसीय नवोपक्रम परिषद

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामधील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्र (SCIIL) व SUK Research and Development Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १४ फेब्रुवारी व शनिवार, दि.१५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये ‘शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद १.०’ चे आयोजन शिवाजी विद्यापीठात करण्यात आलेले आहे. ही परिषद ‘विकसित भारत २०४७ साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप्स’ या विषयावर होत आहे. याकरिता देशभरातील विविध विद्यापीठे, उद्योग व शासनाच्या संलग्नित विभागातील मान्यवर मंडळी सहभागी होत आहेत.

 

 

यामध्ये शैक्षणिक संस्थांमधून सरदार वल्लभाई पटेल विद्यापीठ, (आनंद, गुजरात), होमी भाभा विज्ञान विद्यापीठ, मुंबई (महाराष्ट्र), कौशल्य विकास विद्यापीठ, मुंबई (महाराष्ट्र), इंडो-जर्मन टूल रुम, औरंगाबाद (महाराष्ट्र), डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र), संजय घोडावत अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र), औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर (महाराष्ट्र) अशा नामवंत संस्थाचे तज्ञ प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

तसेच उद्योग क्षेत्रामधून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रिज, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक), गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (गोशिमा), कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन, इंडियन फौंड्रीमन असोसिएशन वेस्टर्न रिजन कोल्हापूर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँण्ड अँग्रीकल्चर, आय.टी. असोसिएशन ऑफ कोल्हापूर (आय. टेक), इचलकरंजी इंजीनियरिंग असोसिएशन, श्रीलक्ष्मी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्लिमा) या प्रथितयश संस्थांचे उद्योग प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शासन स्तरावरुन, ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यता विकास सोसायटी’ (MSInS), नवप्रवर्तन परिषद संस्थान, भारत सरकार (IIC), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार (MSME), राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद (NCVET), नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व उद्योजकता विभाग या विभागांचे तज्ज्ञ मार्गदर्शक सहभागी होत आहेत.

शासनाच्या विविध उपक्रमांस अनुसरुन देशाला सन २०४७ पर्यंत विकसित, आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी शासनाने संकल्प केलेला आहे. यालाच अनुसरुन विकसनशील ते ‘विकसित भारत-२०४७’ हे लक्ष्य साध्य करण्याकरीता स्टार्टअप योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सन २०४७ अखेर भारताला विकसित बनविण्याचे ध्येय दृष्टीक्षेपात ठेऊन स्टार्टअप योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणेसाठी शासन प्रयत्नशील आहेत. याच उद्दात्त हेतूने शिवाजी विद्यापीठाकडून या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या परिषदेमध्ये स्टार्टअपची संकल्पनास्टार्टअपचे महत्त्वयातून होणारी स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती तसेच शासन व वित्तीय संस्थांकडून यासाठी मिळणारी आर्थिक व इतर मदतस्टार्टअपना विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधीशासनाचे यासाठी मिळणारे सहाय्यया क्षेत्रासमोरील आव्हानेया क्षेत्रामधील बदलते तंत्रज्ञान इ. विषयीचे मार्गदर्शन त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिंकडून विद्यार्थी, संशोधक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच उपस्थित जनसमुदाय यांना मिळणार आहे.

सदर परिषदेचा विषय हा विकसित भारत२०४७ साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप्स‘ हा असल्याने शासनाच्या संलग्नित विभागातील वरिष्ठ अधिकारी, उद्योग विश्वातील दिग्गज उद्योजक आणि भारतातील नामवंत विद्यापीठांचे प्रमुख या परिषदेमध्ये आपले मौलिक विचार प्रकट करणार आहेत आणि उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनी, संशोधक, नवसंशोधक, महिला उद्योजक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि जिल्ह्यातील जनसामान्यांना उद्भोदित करणार आहेत.

या परिषदेचे प्रामुख्याने दोन मुख्य भागात विभाजन करण्यात आलेले आहे. यापैकी पहिला भाग हा समाजातील तज्ञ व्यक्तींकडून स्टार्टअप संकल्पनेविषयी मार्गदर्शन व प्रोत्साहनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यालाच जोडून या विषयातील तज्ञ आणि यशस्वी उद्योजक यांच्या सहभागातून चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आलेले आहे. यामध्ये उपस्थित जनसमुदाय तज्ञ व्याख्याते व मार्गदर्शक यांना आपल्या शंका व यासंदर्भातील प्रश्न थेट विचारु शकणार आहेत व भेडसावणा-या समस्यांवर तोडगा मिळवू शकणार आहेत. या परिषदेचा दुसरा भाग म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील विविध उत्पादक कंपन्या, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी हे प्रदर्शन स्टॉलच्या माध्यमातून आपले उत्पादन किंवा सेवा आणि संकल्पना पूर्वपार पद्धतीपेक्षा कशा भिन्न व अधिक प्रभावी आणि रोजगारक्षम आहेत याची माहिती प्रदर्शनास भेट देणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व जनसमुहापर्यंत पोहचविणार आहेत. जेणेकरुन इतरांनाही यातून प्रेरणा मिळेल.

या परिषदेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून गुरुवारदि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवाजी विद्यापीठ, जिल्हा परिषद व Lend a hand India, Pune यांच्या संयुक्त उपक्रमातून १३० अटल टिंकरिंग स्कूल्स कडून १७५ प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये जवळपास ५०० हून अधिक शिक्षक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यातील काही निवडक प्रकल्पांचे पुनश्च सादरीकरण परिषदेमध्ये होणार आहे.

दि. १४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी परिषदेचे उद्घाटन आय.आय.टी. कानपूरचे माजी संचालक, मा. कुलगुरु, अवंतिका विद्यापीठ, उज्जैन (मध्य प्रदेश) आणि भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार २०१३ प्राप्त ख्यातनाम व्याख्याते प्रा. (डॉ.) संजय धांडे यांच्या हस्ते होणार असून परिषदेची सुरवातही डॉ. धांडे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. यानंतर साऊंड कास्टिंग या अतिशय प्रथितयश उद्योगाचे प्रमुख श्री. आनंद देशपांडे आपले विचार व्यक्त करतील. यानंतर टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस या जगद्विख्यात संस्थेचे प्रदेश प्रमुख श्री. ऋषीकेश धांडे हे ‘व्यावसायिक आयुष्याची तयारी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यालाच अनुसरुन दुपारच्या सत्रात महाराष्ट्रातच नव्हे; देशामध्ये नावलौकीक मिळविलेले ‘माने ग्रुप ऑफ कंपनीज्’ चे संस्थापक संचालक ज्येष्ठ उद्योजक श्री. रामदास माने, पुणे हे ‘उद्योजक घडण्यामागची प्रक्रिया’ याविषयी पुढील पुष्प गुंफणार आहेत. यानंतर टी-हब, हैदराबाद (तेलंगणा) या नावाजलेल्या नवोपक्रम संस्थेचे डॉ. राजेश कुमार आडला हे  ‘प्रोडक्ट लीडरशीप’ याविषयी सर्वंकष माहिती देतील. यालाच अनुसरुन देशपांडे फाऊंडेशन, हुबळी या समाजसेवेत अग्रेसर असलेल्या संस्थेचे श्री. नरसिंह नायक पेरमपल्ली हे कौशल्य विकासावर आधारीत विचार मांडतील.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळच्या सत्रामध्ये प्रामुख्याने बारामती अॅग्रो ट्रस्टचे तज्ञ डॉ. संतोष कारंजे हे ‘कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ यावर आपले विचार व्यक्त करतील. यानंतर लगेचच शासन, उद्योग व शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ञ मार्गदर्शक यांचेकडून चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन व उपस्थितांचे शंकानिरसन होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने एन.सी.एल. या ख्यातनाम शासनाच्या प्रयोगशाळेचे डॉ. पी.पी. वडगांवकर, व डॉ. सी.व्ही. रोडे, कौशल्य विकास विभाग, कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त श्री. जमीर करीम, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. अनमोल कोरे, के.पी. मशिन्स चे श्री. संजय पेंडसे, शिंपुगडे ग्रुपचे श्री. बी.एस. शिंपुगडे हे सहभागी होतील. यानंतर महिला उद्योजिकांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले असून यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. ज्योती जाधव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या श्रीमती सुजाता कणसे, कोल्हापूरातील महिला स्टार्टअप उद्योजिका व प्युअरमी संस्थेच्या संस्थापिका शर्मिली माने, अवनि संस्थेच्या संस्थापिका अनुराधा भोसले, भारती डिजिटलच्या तनुजा शिपूरकर आणि छबी या महिलांमध्ये लोकप्रिय झालेल्या ब्रँडच्या संस्थापिका सुप्रिया ढपाळे-पोवार या मार्गदर्शन करतील. यानंतर विद्यापीठाच्या यशस्वी झालेले स्टार्टअप्स त्यांची यशोगाथा व अनुभव कथन करतील. यानंतर गोरे उद्योग समूह, अमेरिका या संस्थेच्या संस्थापिक व संचालिका विनया गोरे आणि सरदार पटेल विद्यापीठ, आणंद गुजरात येथील डॉ. सौरभ सोनी हे अखेरचे पुष्प गुंफतील.

तरी, समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण या परिषदेमध्ये उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि यातून प्रेरणा घेऊन स्वतःला उद्योगक्षम/ उद्योगशील बनवावे. ‘विकसित भारत -२०४७” साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप्स’ चे लक्ष्य साध्य करण्याच्या अनुषंगाने नवोन्मेषाच्या माध्यमातून देशाची व पर्यायाने व्यक्तीगत प्रगती साधून यशस्वी उद्योजक घडविणे हा सदरची परिषद भरविण्यामागे शिवाजी विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे.