कुंभोज (विनोद शिंगे)
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्द वाढीमध्ये समावेश होणाऱ्या संभाव्य यादीमधील मौजे शिरोली ता. हातकणंगले या गावचे नाव वगळून शिरोली गावासाठी स्वतंत्र नगरपरिषद मंजूर करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे हातकणंगलेचे माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांनी केली. यावेळी याबाबत लवकरच जिल्हास्तरीय बैठक बोलवू अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिरोली गावाच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. तसेच येथील औद्योगिक वसाहतीस नोकरीस आलेले कामगार व लघु उद्योगात उतरलेले उद्योजक हे त्या गावचे स्ताईक झाल्याने विस्तारित झालेल्या शिरोली गावाच्या अनेक भागात सुविधा देताना ग्रामपंचायतीला ही मर्यादा येत आहेत त्यामुळे या गावांमध्ये नगरपरिषद स्थापन व्हावी यासाठी सदर ग्रामपंचायतीने आवश्यक त्या शासनाच्या निकषाप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. याउलट या गावाचा कोल्हापूर महापालिकेच्या हद्दी वाढीमध्ये समावेश करण्यात आला.
तर या गावातून गोळा होणारा विविध कर हा गावाच्या विकासासाठी न वापरता शहराच्या विकासासाठी वापरण्याची भीती असल्याने त्या गावातील नागरिकांचा महापालिकेमध्ये समावेश होण्यास तीव्र विरोध आहे. त्यामुळे जनतेचा विरोध लक्षात घेता शिरोली गावाचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीमध्ये न करता सदर गावातील लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी नगरपरिषद करावी अशी मागणी हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी याबाबत लवकरच जिल्हास्तरीय बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी अर्थव्य शिक्षण सभापती प्रवीण यादव, शिरोलीचे मा. ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, विजयराव पवार, अशोक खोत सर्जेराव माने, सिद्धू पुजारी, उपस्थित होते.