कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या 58 शाळा असून या शाळांमधून मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्तीमध्ये उज्वल यश संपादन करीत आहेत. सध्या महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळांमध्ये जवळपास दहा हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 56 विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकाविले आहे. यापैकी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या 21 विद्यार्थ्यांची बंगळूरु येथील इसरोला भेट घडवून आणली जात आहे.
या मोहिमेसाठी कोल्हापूर महानगरपालिकाच्या प्रशासक के मंजूलक्ष्मी यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले आहे. तर उपायुक्त साधना पाटील यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. हे सर्व विद्यार्थी आज महापालिकेच्या मुख्य चौकातून सकाळी 12 वाजता रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्यांना के.एम.टी.च्या वातानुकीत सजविलेल्या बसमधून विमानतळापर्यंत सोडण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व रवाना करण्यासाठी आमदार अमल महाडीक, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पुष्कराज क्षीरसागर, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, शेखर कुसाळे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार अमल महाडिक यांनी बोलताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमधून गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे असलेचे सांगितले. तर आमदार जयंत आसगांवकर यांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक करुन शाळेतील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे गौरवोद्गार यशस्वी विद्यार्थ्यांना रवाना करतेवेळी केले. या विद्यार्थ्यांच्यासोबत प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, एक शिक्षक, एक शिक्षिका व एक महिला डॉक्टर रवाना झाले आहेत. हे विद्यार्थी एअर पोर्टवर गेलेवर या ठिकाणी एअर पोर्टच्या मॅनेजमेंटच्यावतीने या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करुन केक कापण्यात आला.
बंगळूरु येथील इसरोला दिनांक 11 व 12 फेब्रुवारी 2025 या दिवशी भेट दिली जाणार आहे. याकरिता विद्यार्थ्यांना एक वेळ विमानाने प्रवास, परतीचा रेल्वेने प्रवास व संबंधित पर्यटन बसद्वारे केले जाणार आहे. या मोहिमेत इसरो (ISRO) चे इस्ट्रक्ट तसेच मोक्स व पीन्या हा औद्योगिक परिसर पाहण्याची संधी मिळणार आहे. इस्ट्रक्ट या ठिकाणी ग्राउंड ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये सॅटेलाईट कडून येणारे मेसेज पृथ्वीपर्यंत कसे येतात इथून सॅटेलाईट पर्यंत कमांड कशा जातात, इस्रोचे एखाद्या लेटेस्ट ऑपरेशन सुरू असेल तर त्याविषयीही लाईव्ह माहिती विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. सॅटॅलाइट प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेले इंजिन तसेच भारतीय बनावटीचे मॉडेल्स त्याचबरोबरच जवाहरलाल नेहरू प्लेनोटेरियममध्ये थ्रीडी शो प्लेनोटेरियमही पहावयास मिळणार आहे. या रवाना होणा-या सर्व विद्यार्थांना व शिक्षकांना क्रिडाई तर्फे सुट व बुट उपलब्ध करुन दिले आहेत.
महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत असणा-या शिक्षकांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर या गोष्टी घडून आल्या आहेत. इथून पुढेही कोल्हापूर महानगरपालिकांचे विद्यार्थी घवघवीत यश मिळवतील आणि त्यांना एक प्रेरणा मिळेल यासाठी हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांना नजिकच्या महानगरपालिका शाळेमध्ये प्रवेश घेऊन विविध संधींचा लाभ घ्यावा असे प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांनी नमूद केले.
यावेळी शिक्षण समितीकडील प्रकल्पाधिकारी रसूल पाटील, जगदीश ठोंबरे, निकिता आंबुलगेकर, सूर्यकांत ढाले, अजय गोसावी, शांताराम सुतार, सचिन पांडव, नचिकेत सरनाईक, राजाराम शिंदे व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.