कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे)
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकारणातील दिग्गज मंडळी एकवटले आणि आपसूकच कुस्तीचा आखाडा राजकारण्यांच्या शड्डूंनी घुमला. कुस्तीतील राजकारण, महाराष्ट्र केसरी स्पर्धा, मल्लांचे मानधन या बाबींचा ऊहापोह झाला. गुरुवर्य वस्ताद बाळासाहेब गायकवाड यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण आणि लोकनेते सदाशिवराव मंडलिक मल्ल वसतिगृहाचे उद्घाटन असा संयुक्त समारंभ खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते, आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (९ फेब्रुवारी २०२५) मोतीबाग तालीम येथे झाला. माजी खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालीम संघाचे सरचिटणीस महादेवराव आडगुळे यांनी स्वागत केले. तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी भाषणात मोतीबाग तालीम व मल्ल होस्टेलसाठी आणखी वीस लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे नमूद केले. तसेच लोकप्रतिनिधींना उद्देशून, पुढील वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद कोल्हापूरला मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. तत्पूर्वी पैलवान विष्णू जोशीलकर यांनी, कुस्ती संघटनेतील गट-तट खेळासाठी मारक आहे. साऱ्यांनी एकत्र येऊन महासंघ व कुस्तीगीर परिषद असा वाद मिटवावा अशी विनंती केली.
माजी खासदार संजय मंडलिक यांनी, तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना उद्देशून गेल्या वीस वर्षातील लोकसभा निवडणुकीतील खासदारांचे सूत्रधार असा उल्लेख केला. यावरुन उपस्थितांमध्ये चांगलेच हास्य पिकले. मंडलिक म्हणाले, ‘राजकारणाची स्थिती विचित्र बनली आहे. मात्र खेळातील राजकारण हे कुस्तीसाठी मारक आहे. हा वाद लवकर मिटवण्यासाठी सगळयांनी प्रयत्न करू या. शिवाय कुस्तीपटूंच्या समस्या, मानधनाचा विषय यासंबंधी मार्ग काढण्यासाठी कुस्तीशी निगडीत घटकांची मुरगूड येथे संयुक्त बैठक घेऊ असेही आश्वस्त केले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोतीबाग तालीममधील उर्वरित कामासाठी वीस लाख रुपयांचा निधी देऊ. तसेच पुढील वर्षी कोल्हापुरात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होण्यासाठी नक्की प्रयत्न करू. तालीम संघाने कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करावी, स्पर्धेचे यजमानपद कोल्हापूरला मिळवून देण्याचे काम आमचे.’असे स्पष्ट केले. तसेच वस्ताद बाळ गायकवाड यांच्या नावांनी कुस्ती स्पर्धा आयोजित करावी, खर्चाची जबाबदारी उचलू अशी ग्वाही दिली.
मल्लांच्या मानधनावरुन बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले, ‘लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर सरकारने लाडके पैलवान योजना आणावी. त्यांच्या खर्चाचा विषय मार्गी लागेल. शिवाय तालीम संघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा. विलंब केला तर दुसरे कोण तर डाव टाकतील आणि स्पर्धा कोल्हापूरपासून लांब जाईल अशा शब्दांत व्ही. बी. पाटील यांना सूचना केल्या. याप्रसंगी शिल्पकार ओंकार कोळेकर, आर्किटेक्ट गजानन गरुड, बांधकाम व्यावसायिक अजिंक्य नितीन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
अशोक पोवार यांनी सूत्रसंचालन केले हिंदकेसरी दिनानाथसिंह यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कुस्तीगीर परिषदेचे ललित लांडगे, बाळासाहेब पाटणकर, हिंदकेसरी विनोद चौगले, नामदेव मोळे, संभाजी वरुटे, अशोक माने, अमृत भोसले, पी. जी. मेढे, संभाजी पाटील, बी. एच. पाटील, प्रदीप गायकवाड, प्रकाश खोत, आदिल फरास, विजय साळोखे, शिवाजीराव कवठेकर, अमित गाट उपस्थित होते.