घोडावत मध्ये मोफत विधी सहाय्य केंद्राचे उद्घाटन

कुंभोज  (विनोद शिंगे)

संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज तर्फे मोफत विधी सहाय्य केंद्राचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर विधी प्राधिकरणाचे सचिव, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश सुधीर इंगळे आणि कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत उपस्थित होते.

 

 

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांची ओळख लॉ विभागाच्या प्रमुख डॉ.अंजली पाटील यांनी करून दिली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना कायद्याच्या क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी व सामाजिक न्यायासाठीच्या जबाबदाऱ्या यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.ॲड. सर्जेराव खोत यांनी कायदेविषयक अडचणींच्या सोडवणुकीसाठी मूलभूत ज्ञान कसे असावे याविषयी तर सुधीर इंगळे यांनी ‘मोफत विधी सेवा प्राधिकरण’ या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी याचा कसा उपयोग होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे उपस्थित होते, तर यासाठी कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी मार्गदर्शन केले. ॲड. वंदना भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.