मुंबई : उद्धव ठाकरे आज राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीतून ते संपूर्ण राज्यातील आढावा घेणार आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात देखील उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाने तयारीला सुरुवात केल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमाीवरउद्धव ठाकरे आज राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे या सर्वांना आज मार्गदर्शन करणार आहेत, तसेच पुढील रणनितीबाबत काही सूचना देखील करणार आहेत. दरम्यान, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या शिवसेना भवनात येणार आहे. ही बैठक सेना भवनात होणार आहे.
उद्धव ठाकरेंनी दिले स्वबळाचे संकेत
निवडणुका लागल्या नाहीत मात्र जर तुमची तयारी पूर्ण झाली तर आपण नक्कीच कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेऊ, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. काही दिवसातच महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. मी सगळ्यांशी बोलत आहे, मुंबईसह नाशिक, नगर सगळ्यांशी बोलून झाले आहे. सगळ्यांचं मत एकटं लढा असं आहे. पण, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. आधी तुमची जिद्द बघूया. तुमची तयारी बघूया, ज्यादिवशी तुमची तयारी झाली ही खात्री पटेल. त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. काल (23 जानेवारी) मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडला.
या मेळा्यात बोलताना उद्धव ठाकरे हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपुर्वी जेव्हा उद्धव ठाकरे माझ्याशी यासंदर्भात सविस्तर बोलले. तेव्हा त्यांची ही विचारसरणी आहे हे कळलं. मात्र त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंची टोकाची भूमिका नाही, असं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी आज (24 जानेवारी) कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.