सीआयआय कॅम्पस कनेक्टच्या माध्यमातून शैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल :बॉबी क्यूरॅकोस

कोल्हापूर : सीआयआय कॅम्पस कनेक्टच्या माध्यमातून शैक्षणिक आणि औद्योगिक विश्वातील अंतर भरून काढण्यास मदत होईल, असा विश्वास सीआयआय महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट पॅनल अँड डायरेक्टरचे कन्व्हेनर बॉबी क्यूरॅकोस यांनी केले. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ‘सीआयआय कॅम्पस कनेक्ट’ कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शालिनी घोलप या विद्यार्थिनीच्या शास्त्रीय नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सीआयआय इंडस्ट्री अकॅडमी पॅनल अँड डीन करिअर डेव्हलपमेंट अँड कार्पोरेट रिलेशन कन्व्हेनर सुदर्शन सुतार यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा उद्देश सांगून रूपरेषा स्पष्ट केली.

सीआयआय दक्षिण महाराष्ट्र जनरल कौन्सिल अँड मॅनेजिंग पार्टनर चेअरमन अजय सप्रे यांनी सीआयआयचे कार्य विषद केले. उद्योग आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी याची स्थापना झाल्याचं सांगत देशातील धोरण आणि अर्थसंकल्पाच्या ड्राफ्ट मध्ये सीआयआय महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी डी वाय पाटील ग्रुप बद्दल सविस्तर माहिती देत संस्थेच्या स्थापनेपासूनच्या देदिप्यमान इतिहासाला उजाळा दिला. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यावर संस्थेचा नेहमीच भर असल्याचे ते म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप वर भर दिला आहे. मात्र हल्लीची पिढी स्टार्टअप सुरु केल्या केल्या फळाची अपेक्षा करतात. हे चुकीचं असून यामध्ये संयम, कष्ट, चिकाटी आदी गुणांची गरज असते असा सल्ला त्यांनी दिला. या कॅम्पस कनेक्ट मध्ये सहभागी संस्थेतून काही विद्यार्थी, प्रतिनिधी एकत्र येऊन ध्येयवादी इनोव्हेटर निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बॉबी क्यूरॅकोस म्हणाले, आजची पिढी नवतंत्रज्ञानात माहीर आहे. वरिष्ठांनी युवा पिढीकडून हे तंत्रज्ञान शिकले पाहिजे. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे, त्यानुसार स्वतःत बदल करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यासह नोकरीपेक्षा उद्योग, व्यवसायाला अधिक महत्व दिले पाहिजे. आजच्या सीआयआय कॅम्पस कनेक्टच्या माध्यमातून अकॅडमी आणि इंडस्ट्री मधील अंतर भरून काढायला मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनल कौन्सिल अँड डायरेक्टरचे व्हॉइस चेअरमन सारंग जाधव यांनी, शिक्षण ही यशाची किल्ली असल्याचे सांगत क्रिएटिव्हिटी, डिजिटल स्किल, ग्लोबल सिटीजनशिप या गोष्टी अंगीकारण्याचा सल्ला दिला.

यावेळी ‘भविष्याचा वेध – उद्योग-शैक्षणिक संवादातील आकांक्षा आणि आव्हाने’ यावर चर्चासत्र झाले. कोल्हापूर फाउंड्री आणि अभियांत्रिकी क्लस्टरच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भक्ती भद्रा यांनी, शिक्षण आणि उद्योग यामधील अंतर भरून काढण्यासाठी कौशल्यपूर्ण पदवीधर निर्मिती, शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दुवा याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी एस.बी रिसेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन शिरगावकर, अलॉय स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर रवी ढोली, कोफोर्जचे व्हाईस प्रेसिडेंट सचिन पाटील, कलाकृती स्टील फर्निचरचे मॅनेजिंग डायरेक्टर मदन कुलकर्णी, डिकेटीई सोसायटी टेक्सटाईल अँड इंजीनियरिंग इन्स्टिट्यूटचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. जी.एस. जोशी, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी टीपीओ अमेय गौरवाडकर, डी. वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, डि. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, टीपीओ मकरंद काईंगडे, स्नेहल केरकर यांच्यासह विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.