कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ येत्या १७ जानेवारी रोजी ११ वाजता संपन्न होत आहे. त्याविषयीची माहिती आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परिषदेत दोन महत्त्वाची सुवर्णपदके जाहीर करण्यात आली. विद्यापीठाच्या जैव रसायनशास्त्र अधिविभागातील विद्यार्थी बंडू राजू कोळी यांस राष्ट्रपतींचे सुवर्णपदक जाहीर करण्यात आले. सदरचे राष्ट्रपती सुवर्ण पदक सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा, बौद्धिक व कला क्षेत्र व एनसीसी, एनएसएस यांमधील गुणवत्ता तसेच व्यक्तीमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण ज्ञान, वागणूक व नेतृत्व गुण यामध्ये आदर्श ठरल्याबद्दल प्रदान करण्यात येत आहे.
मारगोवा, गोवा येथील कु. क्रिशा अल्दा नोरोन्हा हिला कुलपतींचे सुवर्णपदक जाहीर करण्यात आले. सदरचे कुलपति सुवर्णपदक मार्च-२०२४मध्ये सर्व एम.ए. परीक्षांमधून मानसशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल प्रदान करण्यात येत आहे.