कुंभोज ( विनोद शिंगे)
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात डायलेसिस आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधांचा शुभारंभ माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील उपस्थित होत्या. या नवीन सुविधांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, यापूर्वी सुविधा अभावी अन्यत्र जाणाऱ्या रुग्णांची अडचण दूर झाली आहे.
माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. डायलेसिस आणि शस्त्रक्रिया याबरोबरच लवकरच रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध होणार असून बीएसस्सी नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
रुग्णालयातील संगोपन केंद्र खालच्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे. कुपोषित बालक व मातांसाठी कार्यरत असलेल्या या केंद्राद्वारे पोषण आहार पुरवला जात असून त्याचा लाभ अनेकांना होत आहे. विशेष म्हणजे इचलकरंजीतील एकही बालक कुपोषित नसल्याचा आनंदही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी निवासी वैद्यकिय अधिक्षक अमित सोहनी, डायलेसिस विभागप्रमुख डॉ. अभिजित कोळी, नेत्रचिकित्सक डॉ. अमर पाटील, डॉ. वैराट, पोषण आहार विभागप्रमुख डॉ. संदीप मिरजकर, नर्सिंग अधिसेविका डॉ. चारुशिला एमल, डॉ. सीमा कदम यांच्यासह बाळासाहेब कलागते, राजू बोंद्रे, नितेश पोवार, सचिन हेरवाडे, राहुल घाट, सपना भिसे, अंजुम मुल्ला, सुखदेव माळकरी, कपिल शेटके, विजय पाटील, वसंत येटाळे आदी उपस्थित होते