कुंभोज (विनोद शिंगे)
महान व्यक्तिमत्वाच्या चरित्रातून प्राप्त होणारे जीवन जगण्याचे तत्व विद्यार्थ्यांनी अंगीकृत केले तर निश्चित यश प्राप्त होईल.कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शाहूमहाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कार्यरत असणाऱ्या मेन राजाराम प्रशालेत शिकणारे विद्यार्थी भाग्यवान आहेत. भविष्य उज्ज्वल होण्यासाठी वर्तमान प्रामाणिक कार्य करावे. आयुष्य समृद्ध करण्यासाठी ज्ञान, अर्थ आणि आरोग्य याकडे विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी ( माध्यमिक) अजय पाटील यांनी केले.
येथील समृद्ध शैक्षणिक वारसा असलेल्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांशी संवाद साधताना अजय पाटील बोलत होते. प्रशालेचे प्राचार्य डॉ गजानन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी अजय पाटील, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही. पत्रावळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बी.पी.माळवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांच्या हस्ते करून वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी उच्च माध्यमिक गटातून कु. अल्फिया रफिक भिसुरे हिला तर माध्यमिक विभागातून कु. आराधना विनोद कांबळे हिला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. विविध स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी अभ्यासक्रमाबरोबर अभ्यासेत्तर कार्यक्रमाचे गरजेचे असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रशालेत कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. अशा कार्यक्रमातून ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांचे कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत होते.प्रशालेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत आणि ते आपापल्या क्षेत्रात यशवंत, गुणवंत व किर्तीवंत झाले आहेत. प्रशालेच्या गुणवत्ता पूर्ण निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी जोपासावी असे सांगत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे व पालकांचे तसेच त्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकवृंद व प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांनी कौतुक केले.
उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना प्रशालेत वर्षभर राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा लेखाजोखा सादर करत प्रशालेची होणाऱ्या यशस्वी वाटचालीत विद्यार्थी,पालक व शिक्षक यांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगितले व पुढेही प्रशालेच्या माध्यमातून नवनवीन तसेच अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवण्याचा मानस व्यक्त केला. शाल, श्रीफळ, ग्रंथ व गुलाबाचे पुष्प देऊन प्रशालेचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे अजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
पाहुण्याची ओळख व स्वागत प्रा. बी.पी.माळवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुषमा पाटील व आभार प्रदर्शन सौ.प्रिया पुजारी यांनी केले .या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यी, पालक,देणगीदार, प्रतिष्ठित नागरिक व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.