मंत्री मुश्रीफांनी घेतला जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांनी 13 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अधिकारी वर्गाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कागल येथील एमआयडीसी, संकेश्वर ते बांदा हायवे, गडहिंग्लज येथील क्रीडा संकुल, गडहिंग्लज तालुक्यातील प्रशासकीय इमारत, शहरातील अमृत २ या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासंबंधी तसेच इतर विविध कामांबाबत बैठक घेतली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुमार कार्तिकेन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह कागल, गडहिंग्लज तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.

गडहिंग्लज शहरातील व इतर गावांमधून जाणारा संकेश्वर ते बांधा हायवे वरील स्ट्रीट लाईट बाबत स्थानिकांचे अनेक प्रश्न होते. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच अर्जदार यांच्यासोबत या विषयावर चर्चा करण्यात आली. गडहिंग्लज या ठिकाणी येत्या काळात विविध यात्रा तसेच उरूस आयोजित केले जाणार आहेत त्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच स्थानिकांनी एकत्रित चर्चा करून स्ट्रीट लाईट बसवणे बाबत अंतिम निर्णय घ्यावा. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी येणाऱ्या वीजबिलाबाबत निर्णय घेऊन बसवण्यात येणाऱ्या स्ट्रीट लाईटचा प्रकार ठरवावा अशा सूचना दिल्या.

याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा असेही पुढे सांगितले. या बैठकीत ओसवाल एफ.एम. हॅमरेल टेक्स्टाईल या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाबाबत व कंपनी बंद पडल्या बाबत संबंधित कंपनीचे मालक, कामगार आयुक्त कार्यालय तसेच संबंधित कंपनीतील कर्मचारी यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा झाली. अर्जदार कामगारांनी याबाबत सविस्तर माहिती सांगून कंपनीकडून कामगारांचे दोन वर्षाचे वेतन थकीत असल्याचे सांगून कंपनीकडून आम्हाला आमच्या मागण्यांबाबत काहीतरी अंतिम शब्द मिळावा अशी विनंती केली. याबाबत कंपनीचे मालक श्री सोनवणे यांनी आठ दिवसाचा कालावधी मागून अंतिम निर्णय घेणार असल्याचे कळवले. तसेच त्यांनी सर्व कामगारांना त्यांचे थकीत वेतन कोणत्याही परिस्थितीत देऊ अशी ग्वाहीही दिली. जानेवारी २४ पर्यंत मुदत दिली असून यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

गडहिंग्लज येथील प्रशासकीय इमारत नव्याने बांधण्याबाबत स्थानिकांकडून मागणी करण्यात आली आहे. प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी जागा आवश्यक असून यासाठी तहसील कार्यालयाची जागा व पशुसंवर्धन विभागाकडे असलेली जागा अशा दोन जागांचा पर्याय देण्यात आला. जिल्ह्यातील एका जागेची निवड अंतिम करून नव्याने प्रस्ताव सादर करा. यासाठी आवश्यक निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून तातडीने मंजूर करू अशी ग्वाही दिली.

गडहिंग्लज शहरातील अमृत दोन या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासंबंधी आढावा घेतला. कोल्हापूर शहराजवळ असलेल्या कागल चेक पोस्ट वरील विविध सुविधा तसेच स्थानिक वाहनांना सूट देणे बाबत विविध संघटना तसेच स्थानिकांनी मागणी केली. यावेळी आरटीओ कोल्हापूर, संबंधित चेक पोस्टचे प्रकल्प अधिकारी हितेश पाटील यांच्यासह विविध संघटनांचे तसेच स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चेक पोस्ट परिसरातील विविध सुविधा तयार करणे बाबत व स्थानिकांना त्या ठिकाणी सूट देणे बाबत येत्या आठ दिवसात निर्णय घेण्याचे सूचना दिल्या.