कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात ‘एक तास वाचनाचा’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्तम प्रतिसाद लाभला.
साहित्यातील अतिशय महत्त्वाचे अंग म्हणजे वाचनसंस्कृती. अधिकाधिक लोकापर्यंत वाचनसंस्कृती पोहोचावी, या भावनेतून महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न चालू आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचावीत व वाचनसंस्कृती दृढ व्हावी, या एका उद्देशाने शुक्रुवारी सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये ‘एक तास वाचनाचा’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या आवडीची पुस्तके वाचली. या पुस्तकांचे रसग्रहण लिहून दिल्यानंतर त्यातून तीन क्रमांक काढले जाऊन हॉस्टेल डे कार्यक्रमात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले. अधीक्षक प्रा. कविता वड्राळे, नाईट वार्डन सुनिता पावर, शिला सोनवणे, विद्या माने, वंदना पाटील व वसतिगृहातील विद्यार्थिनी उपक्रमास उपस्थित होत्या.