येत्या काळात मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय’ महत्त्वाचे आकर्षण ठरेल : देवेंद्र फडणवीस

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत नूतनीकृत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे लोकार्पण केले. यादरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला.

 

कुठल्याही शहराची खरी श्रीमंती इमारती, रस्ते किंवा श्रीमंत व्यक्तींवर अवलंबून नसते. ती त्या शहरातील संग्रहालये कशी आहेत यावर ठरते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने संग्रहालय आहे.

डॉ. भाऊ दाजी लाड हे ग्रँड मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचमधील डॉक्टर होते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले. जुन्या लिपी, प्राचीन नाणी व इतर ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आणि अभ्यास करण्याची दुर्मिळ कला डॉ. लाड यांना अवगत होती. मुंबईत ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय उभारण्यासाठी डॉ. लाड यांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील अनेक दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तू दिल्या. येत्या काळात मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी हे संग्रहालय एक महत्त्वाचे आकर्षण ठरेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई महानगरपालिकेने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेऊन उत्कृष्ट दर्जाचे काम पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले.

यावेळी कार्यक्रमास मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. मिलिंद देवरा, आ. राजहंस सिंह, महानगरपालिका आयुक्त, प्रशासक आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त उपस्थित होते.