कोल्हापूर : भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने संतापलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला. दरम्यान, हा प्रकार जेवण करणाऱ्या आचाऱ्यासमोर घडल्याने मोठा अनर्थ टळला. पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मामाचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. महेश ज्योतीराम पाटील असं भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवणाऱ्या मामाचं नाव आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महेश पाटीलच्या भाचीने एक आठवड्यापूर्वी गावातील एका मुलासोबत पळून जाऊन विवाह केला होता. त्यामुळे मर्जीविरोधात भाचीचा विवाह झाल्याने मामाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळे भाचीने पळून जाऊन लग्न केल्याने आपली बदनामी झाली या रागातून मामाने थेट रिसेप्शनच्या जेवणामध्येमध्ये आचाऱ्यासमोर विष टाकले.
जेवणात विषारी औषध टाकत असताना आचारी सुद्धा समोर होता. त्यामुळे हे विष टाकलेलं जेवण कोणाचे पोटात गेलं नाही. मात्र, जेवणामध्ये विषारी औषध टाकत असतानाच मामा आणि आचाऱ्याची चांगलीच झटापट झाल्याची चर्चा आहे. जेवणामध्ये विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहोचवणारा प्रकार उघड झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.