मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गोमांतकीय दुर्गाच्या वाटेवर हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकात श्री शिवछत्रपती महाराज आणि शिवपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यात केलेल्या पराक्रमांची आणि गडकिल्ल्यांच्या महत्त्वाची सविस्तर माहिती दिली आहे.
यावेळी दुर्गराज रायगड किल्ल्याचे चाललेले संवर्धन, तसेच महाराष्ट्र आणि गोव्यामधील इतर गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वतः शिवप्रेमी असल्यामुळे त्यांचा मराठ्यांच्या इतिहास आणि गडकिल्ल्यांविषयी असलेला आत्मीयतेचा दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवला. त्यांच्या सहकार्याने किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला जाईल.