मुंबई : चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत असताना माझी जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडण्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, पुन्हा एकदा मंत्री पदाची संधी दिल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आज पुन्हा एकदा मंत्री पदाची धुरा स्वीकारत असताना मायबाप जनतेच्या आशिर्वादाने आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्राच्या विकासासाठी नवा अध्याय लिहिण्याचा संकल्प अधोरेखित करतो.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यापर्यंत पोहोचून शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी करण्याचा आमचा मानस आहे. राज्यभरात वाचन चळवळ वाढविण्यासाठी ४५ लाख विद्यार्थ्यांना एक पुस्तक वाचनासाठी देणे, राज्यातील ३० हजार शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून पालकांना जागृत करणे यावर उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग प्राधान्याने कृती करणार आहे.
पदभार स्वीकारताना उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईकजी , उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विकास रस्तोगीजी आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.