पुणे: पुण्याच्या सिंचननगर परिसरातील कृषी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर सालाबादप्रमाणे यंदाही आयोजित भीमथडी जत्रेत शरद पवार आवर्जून सहभागी झाले होते. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या विविध स्टॉल्सला भेट दिली; त्यांचे व्यवसाय आणि उत्पादनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.
पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार यांची यंदाच्या वर्षी २५ वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे यावर्षीची भीमथडी जत्रा डॉ. अप्पासाहेब पवार यांना समर्पित केलेली आहे. या जत्रेला लोकांचा नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. पण यंदाच्या वर्षी महाराष्ट्राबाहेरून सुद्धा विशेषत: तेलंगणासारख्या राज्यांतून अधिक प्रतिसाद मिळालेला दिसतोय. भीमथडीचे काम आता देश पातळीवर जातंय आणि देश पातळीवरील उत्तम कलाकारांचा यामध्ये सहभाग होतोय.
तसेच, भीमथडी जत्रेमध्ये महिला बचत गटांचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेला जाणवला. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व सबलीकरण चळवळीला हातभार लागण्यास मदत होईल, असा विश्वास आहे. प्रामुख्याने ग्रामीण गृह उद्योगांना चालना देण्याच्या हेतूने आयोजित भीमथडी जत्रेचे प्रवर्तक सुनंदा पवार यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या.