रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांच्याकडे महिला रोजगार प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र स्थापनेसाठी निधीची मागणी

नागपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी महेश्वर (म.प्र.) येथे सुरु केलेल्या हातमागावर साडी बनवण्याच्या कारखान्याच्या धर्तीवर चोंडीमध्ये महिला रोजगार प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन त्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबतचं निवेदन त्यांना दिलं.

 

 

 

याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यभर खोदलेल्या विहिरी आणि बारव यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, चोंडीमध्ये सीना नदीवर लातूर टाईप बंधारा बांधल्यास त्याचा शेतीसाठी उपयोग होईल आणि बोटिंगच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होईल, त्यासाठी निधी द्यावा.

दिघी ते आघी जोडरस्ता व सीना नदीवर पूल उभारण्यासाठी निधी, शनैश्वर महादेवाच्या मंदिराची दुरुस्ती, सौर ऊर्जेवरील पथदिवे, सीसीटीव्ही यंत्रणा, सभामंडप यासाठीही निधी देण्याची मागणी केली. येथील मंजूर असलेल्या ३३ के.व्ही उपकेंद्राचं काम जलदगतीने करण्याच्या सूचना देण्याचीही मागणी केली. मेंढपाळ बांधवांच्या पारंपरिक वस्तू विक्रीसाठी व्यापारी गाळे उभारणे आणि सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय करणे, येथील जि.प. शाळेत विज्ञान व संगणक प्रयोगशाळा उभारण्यासाठी निधी, म्युझियम आणि घाटाच्या विस्तारीकरणासाठी वाढीव निधी आणि जयंतीच्या शासकीय कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी रुपये निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

याशिवाय गेल्या काही दिवसांत रोहित पवार यांनी स्वतः उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करणे, प्रत्येक तालुक्यात MIDC स्थापन करणे आणि दुष्काळग्रस्त असलेल्या माझ्या मतदारसंघात शेती व पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांनुसार करण्यात येणाऱ्या विविध सर्वेक्षण आणि विविध योजनांना गती मिळावी, अशी मागणी केली.