कोल्हापूर : तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. हा बंधारा शेतकरी बांधवांच्या बरोबर नदी काठावरील नागरिकांना वरदान असून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे भरीव निधी देऊन हा बंधारा मजबूत करणार आहेत.
तेरवाड बंधारा दुरुस्तीचे काम गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. या कामाची पाहणी राजेंद्र पाटील यांनी केली. तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम २०१७ साली मंजूर झाले होते. त्यावेळी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवातच केली नसल्याने बंधाऱ्याचे काम प्रलंबित राहिले होते. प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया राबवून दुसऱ्या ठेकेदाराला काम सोपवले आहे. या निधीतून बंधाऱ्याच्या पाणी अडवणुकीच्या, काँक्रिटीकरण, दोन्ही काठांचा भराव आणि संरक्षक कठड्यांच्या दुरुस्ती करण्यात येणार आहे.
आज तेरवाड बंधाऱ्याची आमदार राजेंद्र पाटील यांनी पाहणी केली व बंधाऱ्याच्या मजबुतीसाठी भरीव निधी देण्याची ग्वाही यावेळी दिली.यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यासह प्रकाश पाटील टाकवडेकर, युवराज पाटील, शरद आलासे, रमेश भुजूगडे आदी उपस्थित होते.