कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. 22 डिसेंबर रोजी ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील गुणवंत विद्यार्थ्याना ५० हजार रुपयांची बक्षिसे मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी दिली.
कॅम्पस संचालक डॉ.अभिजीत माने म्हणाले संस्थेचे उपाध्यक्ष, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या संकल्पनेतून या परिक्षेची सुरुवात झाली आहे. सध्याच्या संगणक युगात गणित या विषयाला महत्व आले असून आयटी क्षेत्र असेल किंवा डेटा सायन्स अथवा मशीन लर्निंग सारखे नवीन क्षेत्र असो यामध्ये गणिताला महत्वाचे स्थान आहे. या संधीचा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ व्हावा वगणित या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली भीती, त्याबाबतचा न्यूनगंड कमी होऊन विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून आम्ही या परीक्षेचे आयोजन करत आहोत.
कोल्हापूरसह सांगली, सातारामधील विध्यार्थी ही परीक्षा देत असतात. ऑब्जेक्टीव्ह पद्धतीने होणाऱ्या १०० गुणांच्या या परीक्षेत ५० प्रश्न असतील. यामध्ये प्रामुख्याने एमएचटी-सीईटी च्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सीईटी परीक्षेचा सराव होणार आहे. तसेच परिक्षेनंतर आयआयटीच्या तज्ञ प्राध्यापकांकडून शंका निरसन केले जाणार आहे.
या परीक्षेचा निकाल ३१ मार्च 2025 रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी बक्षिसे देण्यात येणार असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात किवा coes.dypgroup.edu.in या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांनी केले.