मुंबई : नागपूरच्या राजभवनमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते. यावरून रामदास आठवले यांनी आपली उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. तसेच मंत्रीपद न मिळाल्याचीही खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपकडून याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास आठवले यांची माफी मागितली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या शपथविधीचे स्थळ अचानक बदललं . या कार्यक्रमासाठी सर्व पक्षांना मी पत्राच्या माध्यमातून निमंत्रण पाठवले होत. मात्र रामदास आठवले यांना मी स्वतः निमंत्रण द्यायला हवं होतं. ते देऊ शकलो नाही, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. रामदास आठवले यांचे महायुतीत मोठे स्थान आहे. त्यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील.