कोल्हापूर:- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने 52 हजार शेणी प्रशासक कार्तिकेयन एस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. पंचगंगा स्मशानभुमीस महापालिकेचे कर्मचारी दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शेणी देतात. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या शेणी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
महापालिका कर्मचाऱ्याकडून गेली 11 वर्षे पंचगंगा स्मशानभुमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रथम वर्षी 10 हजार शेणी, दुसऱ्या वर्षी 20 हजार शेणी, तिसऱ्या वर्षी 30 हजार, फायर एक्स्टयुगेशर व भिंतीवरील मोठे घडयाळ व चौथ्या वर्षी 30 हजार शेणी, पाचव्या वर्षी 40 हजार व सहाव्या वर्षी 40 हजार, सातव्या वर्षी 40 हजार शेणी, नवव्या वर्षी 35 हजार, दहाव्यावर्षी 51 हजार व यावर्षीही 52 हजार शेणी सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाडगे, नगरसचिव सुनील बिद्रे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, एलबीटी अधीक्षक विश्वास कांबळे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी संख्येने उपस्थित होते.