कोल्हापूर : इचलकरंजी शहरात बनावट दस्त आणि कागदपत्रे तयार करुन आणि तामीळनाड बँकेतील अधिकार्यांच्या संगनमताने मिळकतीवर 12 कोटी 18 लाख रुपयांचा बोजा टाकत फसवणूक केल्याप्रकरणी एका नामांकित वकिलासह 9 जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती दत्तोबा निमणकर, प्रकाश मारुती निमणकर, राजेश मारुती निमणकर, ऋषिकेश राजेश निमणकर, अभिषेक राजेश निमणकर (सर्व रा. राजाराम रोड), अॅड. एस. एन. मुदगल, दत्तात्रय पी. म्हातुगडे (रा. कागवाडे मळा), तामीळनाड बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी गणेशकुमार (रा. शिवकाशी ब्रँच विरुध्दानगर), विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमानिक्कम (सध्या रा. निसर्ग रेसिडेन्सी जुना चंदूर रोड मूळ रा. मदुराई) अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी अॅड. दिगंबर शंकरराव निमणकर (वय 75 रा. राजाराम रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
इचलकरंजी शहरातील फिर्यादी अॅड. दिगंबर निमणकर यांच्या मालकीची सिटी सर्व्हे क्र. 15864/4, 15866 व सिटी सर्व्हे क्र. 15866/1 ते 9 अशी मिळकत आहे. तर मारुती निमणकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत. नमुद मिळकतीचे टी. पी. स्किम 1, फायनल फ्लॉट नं. 255 मधील पान क्र. 3 व उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांचे आदेशान्वये नमुद मिळकतीवर प्रकरणी अंतरिम स्थगिती दिली आहे. असे असताना सन 2022 ते 2024 या कालावधीत नात्याने चुलत भाऊ असलेल्या संशयित मारुती निमणकर, मंगल टेक्स्टाईल व प्रकाश विव्हींग मिल्स्चे प्रोप्रा. प्रकाश निमणकर, मे. मारुती टेक्स्टाईल व राजेश टेक्स्टाईलचे प्रोप्रा. राजेश निमणकर, ऋषिकेश टेक्स्टाईलचे प्रोप्रा. ऋषिकेश निमणकर, अभिषेक टेक्स्टाईलचे प्रोप्रा. अभिषेक निमणकर यांनी अॅड. एस. एस. मुदगल, तामीळनाड बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी. गणेशकुमार, विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमानिक्कम यांना हाताशी धरुन चुकीच्या कार्यपध्दतीद्वारे संगनमताने 12 कोटी 18 लाख रुपयांचे कर्ज बनावट दस्त व कागदपत्रांद्वारे करुन घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर अॅड. दिगंबर निमणकर यांनी फसवणूक प्रकरणी उपरोक्त 9 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे