शिवाजी विद्यापीठात भारतीय भाषा दिवसानिमित्त ३५ विद्यार्थ्यांची देवनागरी स्वाक्षरीची शपथ

कोल्हापूर – थोर कवी चिन्नास्वामी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात भारतीय भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देवनागरीत स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी 35 विद्यार्थ्यांनी देवनागरीमध्ये स्वाक्षरी करत येथून पुढे देवनागरीमध्येच स्वाक्षरी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

 

यावेळी विद्यार्थी गुलामगौस तांबळी यांनी उर्दू आणि हिंदीचे महत्त्व सांगितले. हर्षिता माने हिने मराठी भाषेतील विविध बोलींतील संवाद अभिनयाच्या माध्यमातून सादर केले. महेक नदाफ सुप्रिया पवार यांनी कन्नडचे महत्त्व  आणि कन्नड-मराठी भाषेतील समानतेबाबत विचार व्यक्त केले.  

हिंदी विभाग प्रमुख तुप्ती करेकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी भारतीय भाषा महोत्सवाचे महत्त्व हिंदी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रकाश मुंज यांनी सांगितले, तर भारतीय भाषा दिनाची संकल्पना डॉ. संतोष कोळेकर यांनी स्पष्ट केली. या उपक्रमात डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. प्रकाश निकम व एम.ए. हिंदी, एम.ए. भाषा टेक्नोलॉजी, अनुवाद पदविका आणि पीएचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.