मराठा कालखंडातील लष्करी वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या वाघ दरवाजाचे जतन व संवर्धन कार्यास सुरुवात

पुणे : स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज रायगडावरील ज्या दरवाजातून निसटले, तो दरवाजा म्हणजे वाघ दरवाजा.
या दरवाजाकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती आवश्यक आहे. वाघ दरवाजा आजही चांगल्या स्थितीत असून त्याचे जतन आणि संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व खात्याच्या मान्यतेने रायगड विकास प्राधिकरणा च्या वतीने सुरू आहे.

 

मराठा कालखंडातील लष्करी वास्तुशास्त्राचा (Military Architecture) सर्वोत्तम नमुना म्हणून वाघ दरवाजाची ओळख आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडाला मुघलांनी वेढा दिला होता. त्या वेढ्यातून छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई राणीसाहेब आणि काही मोजके सहकारी याच वाघ दरवाजामार्गे निसटले होते.

वाघ दरवाजा आणि त्याच्याशी जोडलेल्या तटबंदीचे दस्तऐवजीकरण केल्यानंतर जतन व संवर्धनाचे काम तीन टप्प्यांत सुरू करण्यात आले आहे.
या कामात पुढील गोष्टींचा समावेश आहे:

1. वाघ दरवाजा व तटबंदीवर उगवलेली झाडे-झुडपे हटवून (Vegetation Clearance) त्याचे रासायनिक फवारणीद्वारे समूळ उच्चाटन केले जाईल.

2. वाघ दरवाजाच्या आतील छताला गळती असल्याचे आढळले आहे. ही गळती काढून छत पारंपरिक बांधकाम साहित्याचा उपयोग करून जलरोधक केले जाईल (Water Tightening).

3. वाघ दरवाजाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या तटबंदीच्या भिंतींचे संवर्धन केले जाईल. भिंतींच्या वरच्या पृष्ठभागाला पारंपरिक पद्धतीने जलरोधक करण्यात येईल. पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी तटबंदीतील मूळ जलनाळ्या पुन्हा कार्यान्वित केल्या जातील.

मराठा साम्राज्याच्या अतिशय बिकट प्रसंगी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वाघ दरवाजाचे जतन व संवर्धन प्रगतीपथावर असल्याचे पाहून मनस्वी आनंद व समाधान वाटते.
वाघ दरवाजाचे संवर्धन व जतन चालू असल्याने शिवभक्तांनी याठिकाणी जाण्याचा प्रयत्न करु नये. हा दरवाजा अत्यंत दुर्गम व अवघड वाटेवर असल्याने येत्या काही दिवसात शिवभक्तांच्या सुरक्षतेसाठी उपाय योजना करण्यात येतील. असे सांगण्यात आले आहे.