यड्राव : राज्य सरकार आणि विद्यापीठाची हि ‘अविष्कार’ प्रोजेक्ट स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला जागृत करण्याचे काम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडत आहेत. यांच्यामधूनच संशोधक, उद्योजक बनणार आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनाला दिशा देण्याचे काम या स्पर्धेतून होत आहे. शरद इन्स्टिट्युटने यजमानपद घेवून आपल्या या कार्याला साथ दिली आहे. असे प्रतिपादन राज्यस्तरीय आविष्कारचे निमंत्रक व संघटन सचिव डॉ. संजय खोब्रागडे यांनी केले.
ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंतर्गत ‘अविष्कार २०२४’ या आंतर विद्यापीठीय संशोधन प्रोजेक्ट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी श्री. बागणे म्हणाले, देशाला महासत्ता करण्याची क्षमता ग्रामिण तरुणांच्यामध्ये आहे. सामान्य कुटुंबातील मुलांना राज्य, देशपातळीवर नेण्याचे काम शरद इन्स्टिट्युट व विद्यापीठे करीत आहेत. संशोधन प्रकल्प आणि नोकरी किंवा उद्योजकता ह्या समांतर गोष्टी आहेत. त्यामुळे अशा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत.
स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सहा विभागातून ३३५ महाविद्यालयातून १८६ पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते. यावेळी डॉ. संगिता धहोत्रे, प्राचार्य डॉ. संजय खोत यांनी अविष्कार स्पर्धा याविषयी माहिती दिली.
यामध्ये पदवी, पदव्युत्तर अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर सहा क्षेत्रांमध्ये विद्यार्थी त्यांच्या संशोधनाची मांडणी केली होती. विविध क्षेत्रातील परिक्षकांनी परिक्षण केले. यावेळी विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, समन्वयक, विद्यार्थी उपस्थीत होते.
स्वागत डॉ. सचिन गुरव यांनी केले. सूत्रसंचालन विधी फराटे, जान्हवी कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा. धनश्री बिरादार यांनी मानले.