उसाचा दर ३७०० रुपये प्रतिटन करावा ; अन्यथा हंगाम रोखण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशारा

कोल्हापूर : उसाचा दर ३७०० रुपये प्रतिटन जाहीर करावा, अन्यथा हंगाम रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सावकर गटाने दिला आहे. मागणीची आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास होणाऱ्या आंदोलनास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी दिला आहे.

 

 

मादनाईक म्हणाले, ‘दरवर्षी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे विश्वस्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, साखर सहसंचालक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयांत ऊसदराची बैठक होऊन पहिल्या उचलेचा निर्णय होत होता. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुका आणि हेतूपुरस्सर कारखानदारांनी लांबवलेल्या गळीत हंगामामुळे पहिल्या उचलीचा निर्णय न होताच साखर हंगाम सुरू झाला आहे.

अशा स्थितीत ऊसतोड बंद आंदोलन करणे शेतकरी व कारखानदारांच्या हिताची गोष्ट नाही हे जाणून आम्ही ऊस तोड व रस्त्यावरील आंदोलन केलेले नाही. यावर्षी १०.२५ रिकव्हरीला ३४०० रुपये दर मिळणार आहे. जिल्ह्यातील रिकव्हरीचा व उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करता प्रतिटन ३७०० पहिली उचल शेतकऱ्यांना मिळणे शक्य आहे. गतवर्षीचा एफआरपी बेस गृहीत धरून काही कारखान्यांनी देऊ केलेली रक्कम मान्य नाही. त्यामुळे आम्ही कधीही व कोणत्याही वेळेला गळीत हंगाम रोखू शकतो हा आजवरचा इतिहास आहे.

संघर्ष होऊ नये ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण त्वरित साखर कारखानदारांबरोबर बैठक घडवून आणावी आणि पहिल्या उचलीचा निर्णय जाहीर करावा. आठ दिवसांत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलन रोखू, शिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाचे राहील, असाही इशारा दिला आहे. अपर जिल्हाधिकारी, अपर पोलिस अधीक्षक, साखर सहसंचालक यांना दिलेल्या निवेदनावर जालिंदर पाटील, मिलिंद साखरपे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, शैलेश आडके, सागर मदनाईक, सतीश हेगाण्णा यांच्या सह्या आहेत.