हातकणंगलेत चारपाच दिवसाआड पाणी पुरवठा : नागरीकातून संताप

कुंभोज  (विनोद शिंगे)
गेल्या काही महिन्यांपासून हातकणंगले शहराला चार ते पाच दिवसांतून एकदा किंवा आठवड्यांतून एकदाच पाणी येत आहे. पूर्वी एक दिवसांआड येणारे पाणी आता चार पाच दिवसांवर गेल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे . यावर लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन कोणीच उपाय शोधणार नसतील तर त्यांना निवडून देऊन काय फायदा ? असा सवालही नागरिकांतून उपस्थित होत आहे.

 

 

पंचवीस वर्षापूर्वी हातकणंगले आणि नेज साठी पाणी पुरवठा योजना तत्कालिन पाणीपुरवठा मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी मंजूर केली. त्यावेळी नेज साठी दिवसा काठी तीन तास तर हातकणंगले साठी २१ तास पाणी घेण्याचे ठरले . कालांतराने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामध्ये नेज साठी ६ आणि हातकणंगले साठी ३८ तासांचा ठराव करण्यांत आला . मात्र आता नेज सुमारे तेरा तास पाणी वापरत असल्यामुळे हातकणंगलेकरांना चार ते पाच दिवसांनी पाणी मिळत आहे.

त्यातही कधी लाईट गेली , लिकेज आहे किंवा मोटर बंद पडली अशा या ना त्या कारणाने वारंवार पाणी पुरवठा बंद असतो . वर्षाकाठी १२०० रुपये पाणी पाणीपट्टी आकारली जात असताना व नदीत मुबलक पाणीसाठी असतानाही वर्षातून ३६५ दिवसांपैकी फक्त १०० च दिवस पाणी मिळत असल्याने नागरिकांतून या व्यवस्थे विरोधांतच संताप व्यक्त केला जात आहे .

पाईप लाईन बदलण्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून सुमारे तीस लाखाची तरतूद केली आहे . नविन पाणी योजनेचाही प्रस्ताव विचारांधीन आहे . काही वेळा कर्मचारीही चालढकल करत असतांत . त्यांचीही मीटींग घेऊन ताकीद दिली आहे . लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल अन्यथा चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. असे नगराध्या अर्चना जानवेकर यांनी सांगितले