मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उबाठा पक्षांच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उबाठा पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आलीय. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात आलीय. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळ सभागृह नेता बनले आहेत.तर,भास्कर जाधव यांच्याकडे शिससेना गटनेता पदाची जबाबदारी देण्यात आलीय.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा, तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोदम म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना युबीटीतील निर्णय होतील.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तसेच, हा निकाल महाराष्ट्रातील जनतेला मान्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित करत ईव्हीएमच्या घोळावरुन संशयही व्यक्त केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाचानिकाल अंतिम मानून आता पुढील कामकाज करावे लागणार आहे.