कोल्हापूर:घोडावत ग्रुपची गृह उपयोगी वस्तूंच्या उत्पादनातील वाढ , विमान व शिक्षण क्षेत्रातील प्रगती, किरकोळ बाजारपेठ,बांधकाम, टेक्सटाइल व खाणकाम उद्योगातील भरारी यामुळे यावर्षीचा टाइम्स संस्थेकडून दिला जाणारा फेमिना अचीव्हर्स अवॉर्ड, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात संजय घोडावत यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते आदिनाथ कोठारे, डिझायनर शितल बियाणी उपस्थित होते.
यावेळी बोलताना घोडावत म्हणाले, हा पुरस्कार मिळणे एक मोठा सन्मान आहे. घोडावत समूहाच्या अथक परिश्रम आणि वचनबद्धतेचे हे फळ आहे. माझे सहयोगी, मित्र, कुटुंब,भागधारक आणि हितचिंतक यांचेकडून वर्षानुवर्ष मिळालेल्या मदतीबद्दल मी आभारी आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही काम यशस्वी झाले नसते. या पुरस्कारासाठी शितल बियाणी यांनी माझी निवड केली त्याचा मी आदरपूर्वक स्वीकार करतो.
संजय घोडावत यांनी कोल्हापूर आणि परिसरात राहून स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मिठापासून ते विमानापर्यंत विविध क्षेत्रात उद्योगांची उभारणी केलेली आहे. तसेच संजय घोडावत शिक्षण संकुलाची स्थापना केली आहे. यामध्ये संजय घोडावत विद्यापीठ, इंटरनॅशनल स्कूल, पॉलिटेक्निक,आयआयटी व मेडिकल अकॅडमी सुरू केली आहे. येथे 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. भविष्यात मेट्रो सिटी मध्ये इंटरनॅशनल स्कूल उभारण्यात येणार आहेत. ज्यामध्ये मुंबई,पुणे, बेंगलोर, हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. उद्योग व शिक्षण क्षेत्रातून 10 हजार रोजगार निर्मिती झाली आहे. तसेच 3 हजार स्टार लोकल मार्ट उभारण्यात येणार आहेत. यामधून 25 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. सोशल फाउंडेशन द्वारे सामाजिक कार्यात घोडावत ग्रुप नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यामुळे हा पुरस्कार घोडावत यांना दिला जात असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.