कोल्हापूर (संग्राम पाटील)
वयात येताना मुलींना आरोग्याच्या काही समस्या निर्माण होतात. मात्र त्याबाबत मुली पालकांशी मनमोकळा संवाद साधत नाहीत. त्यामुळे आजार वाढू शकतो. मुलींनी मनमोकळेपणाने आपल्या आईशी आरोग्याबद्दल बोलायला हवे, असे आवाहन भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. लक्षतीर्थ वसाहतीमधील प्रबुध्द भारत हायस्कूलला सॅनिटरी मशीन वितरण समारंभात त्या बोलत होत्या.
भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने, लक्षतीर्थ वसाहतीमधील प्रबुध्द भारत हायस्कूलला सॅनिटरी नॅपकीन मशीन देण्यात आले आहे. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते हे मशीन शाळेकडं सुपूर्द करण्यात आले. भागीरथी संस्थेच्यावतीनं आजवर जिल्ह्यातील हजारो महिलांचे संघटन करुन, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी देण्यात आल्या. आता रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अरुंधती महाडिक यांनी जिल्ह्यात सामाजिक कामांचा धडाका लावलाय, असे उद्गार शिवानी पाटील यांनी काढले.
वयात येताना मुलींना काही आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. पण मुली त्याकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक मुलींनी आरोग्याच्या समस्येबाबत पालकांशी मनमोकळेपणे बोलणे गरजेचे आहे, असा सल्ला सौ. अरुंधती महाडिक यांनी दिला. भागीरथी संस्थेच्यावतीने किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत आणि स्वसंरक्षणाबाबत जागृती केली जात असल्याचे सौ. महाडिक यांनी नमूद केले. मुख्याध्यापक एस. एस. आर्दाळकर यांनी भागीरथी संस्था आणि रोटरीच्यावतीनं राबवल्या जाणार्या उपक्रमांचे कौतुक केले. तर रोटरीचे सचिव बी. एस. शिंपुकडे, राहुल पाटील यांनी रोटरीच्या उपक्रमांची माहिती दिली. माजी मुख्याध्यापिका शन्मुखा आर्दाळकर यांच्यासह एस. पी. पाटील, वसंत आर्दाळकर आणि विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.