राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिनानिमित्त मुंबईतील नायगाव येथे शहीदांना मानवंदना

मुंबई:राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिनानिमित्त आज मुंबईतील नायगाव येथील पोलीस मैदान येथे शहीद झालेल्या पोलीस बांधवांना मानवंदना दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन देखील उपस्थित होते.

 

 

यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने विशेष संचलन करून शहीद पोलीस बांधवांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी पोलीस शहीद स्मारकाला अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर गतवर्षी पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस बांधवांच्या कर्तव्याप्रती श्रद्धेला सलाम करीत त्यांच्या कुटूंबियांना सन्मानित करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

पोलीस हे आपल्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात म्हणून आपण आपल्या घरात सुखाने झोपू शकतो, सण, उत्सव आनंदाने साजरे करू शकतो. त्यांनी केलेल्या त्यागाची आणि बलिदानाचे स्मरण सदैव आपल्याला रहावे यासाठी पोलीस हुतात्मा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने त्यांच्या बलिदानाला विनम्रपणे वंदन करून त्यांच्या कुटूंबियांसोबत आम्ही सर्व जण सदैव आहोत याची खात्री दिली.अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलाच्या महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती आणि मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद पोलिसांचे कुटूंबीय उपस्थित होते.