बाळेकुंद्री : श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचा ११९ वा पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री येथील मंदिरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व देशातील अनेक भागातून आलेल्या श्री पंत संप्रदायातील लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.
दरम्यान श्री पंत महाराज ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष श्री पंत महाराजांचे पणतू परमपूज्य गुरुवर्य डॉ. संजयपंत अरुणपंत बाळेकुंद्री महाराज यांच्या हस्ते हसन मुश्रीफ यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी गडहिंग्लज, उत्तुर व कागल परिसरातून आलेल्या भक्तांच्या निवारास्थळी भेट तसेच येथील श्री. दत्तपंती भजनातही काही काळ ते तल्लीन झाले.
ट्रस्टचे अध्यक्ष परमपूज्य गुरुवर्य डॉ. संजयपंत बाळेकुंद्री महाराज यांनी मंत्री मुश्रीफ यांना मंदिर व परिसराची माहिती देताना म्हणाले, ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश मिशनरी शिक्षण संस्थेचे प्राचार्य असलेल्या श्री. पंत महाराज बाळेकुंद्री यांना निस्सीम दत्तभक्त श्री. बाल मुकुंद महाराजांचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी अध्यात्मात झोकून दिले. त्यामुळे “गुरु ते सद्गुरु……” असा झालेला त्यांचा अलौकिक प्रवास झाला आहे. यामुळे लाखो भक्तांमुळे हा पंत संप्रदाय अगणित पटीने वाढतच आहे.
यावेळी आनंद आत्माराम पोवार, रा. लिंगनूर कापशी, बाबासाहेब उर्फ पोपट सांगले- मुगळी, चंद्रकांत पाटील -कौलगेकर, तानाजी काटकर आदींसह भक्तगण उपस्थित होते.