आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य केले. याही वेळी विधानसभा निवडणूक काळात सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य स्तरावरील व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष पदाधिकारी यांची बैठक शाहूजी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी त्या त्या विषयांची माहिती दिली व उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. या बैठकीत आदर्श आचारसंहिता पालन, निवडणूक खर्च आणि राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण व मतदान प्रक्रिया हे विषय होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात मतदान टक्केवारी नेहमी चांगली असते. परंतु आपणाला अजून यात वाढ करायची आहे. लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवात मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासनाला आचारसंहितेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय पातळीवरील सहकार्य अपेक्षित आहे. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी उपस्थितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विषयांवर माहिती दिली. अतुल आकुर्डे यांनी निवडणूक खर्चाचे प्रकार, निवडणूक खर्च विषयक कायदेशीर तरतुदी, निवडणूक खर्च सनियंत्रण व व्यवस्थापन, सादर करावयाचे लेखे विषयी माहिती माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक विषयक जाहिरातींना प्रमाणीकरण देण्याची कार्यपद्धती तसेच पेड न्यूज बाबत माहिती दिली. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे यांनी केले.