मुंबई : काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु टेंडर घ्या व कमिशन द्या या भाजपा महायुती सरकारच्या धोरणानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर भाजपा युती सरकारने २०० कोटींची उधळपट्टी केली आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा अशा पद्धतीने इव्हेंट, जाहिरातीबाजी आणि चमकोगिरीवर उधळून लूट सुरु आहे, असा प्रहार प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा सरकारने प्रचंड महागाई करुन ठेवली आहे, ७० रुपयाचे तेल १२० रुपये केले, साखर, गुळ, डाळी, रवा अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगणाला भिडल्या आहेत. नोकऱ्या नाहीत त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत नाही अशा परिस्थितीत ‘लाडकी बहिण’ योजनेची जाहिरातबाजी करून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना काय दाखवायचे आहे? यांनी घरातून पैसे दिले, की प्रॉपर्टी विकून पैसे दिले? ते जनतेचे पैसे आहेत, जनतेच्या कराच्या पैशांची अशा पद्धतीने उधळपट्टी केली जात असल्याने सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.