विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाकडून भेटी ;चंदगड, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरीतील मतदान तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

कोल्हापूर : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चंदगड, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी तालुक्यातील मतदान तयारीबाबतचा प्रत्यक्ष जावून आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक कामाशी निगडीत कार्यालय प्रमुख, फिरते तपासणी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओद्वारे पाळत ठेवणारे पथक यांचा आढावा घेतला व कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्या. त्यानंतर ईव्हीएम स्ट्राँग रुम, मतदान साहित्य वाटप व स्वीकृती ठिकाण आणि मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या ठिकाणालाही भेटी दिल्या. यावेळी चंदगड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांदे, राधानगरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हरेश सूळ, कागल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसिलदार चंदगड राजेश चव्हाण, तहसिलदार गडहिंग्लज ऋषिकेत शेळके, तहसिलदार भूदरगड अर्चना पाटील, तहसिलदार राधानगरी अनिता देशमुख यांच्यासह स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी त्या त्या ठिकाणी उपस्थित होते.

 

 

पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या चंदगड येथील कुमार माध्यमिक शाळा, शाळेतील मतदान केंद्रास भेट देवून मतदारांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत त्यांनी पाहणी केली. तसेच तहसिलदार कार्यालयातील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या कक्षास भेट देवून आवश्यक सूचना केल्या. यावेळी नोडल अधिकारी तसेच सेक्टर अधिकारी उपस्थित होते. साहित्य वाटत व साहित्य स्विकृत ठिकाणी तसेच सुरक्षा कक्ष, मतमोजणी ठिकाणास भेट देवून इमारतींची पाहणी केली. मौजे गंगापूर येथील तीन मतदान केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या. कागल येथील स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्र तसेच जवाहर नवोदय विद्यालय कागल येथे भेट देवून नोडल अधिकारी यांची बैठक तहसील कार्यालय कागल येथे घेतली.

यावेळी त्यांनी ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या घरबसल्या मतदान सुविधेचा तसेच मतदार माहिती चिठ्ठीच्या वाटपाचा आढावा घेतला. तसेच कागल, गडहिंग्लज, गारगोटी, आजरा या तालुक्यांमधील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.