मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. मात्र वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. परचुरेंच्या या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अतुल परचुरे हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी कित्येक दिवस उपचार घेतले. उपचारानंतर त्यांची प्रकृती बरी झाली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली होती. त्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केला होता. मात्र, आज १४ ऑक्टोबर रोजी अतुल यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. अनेकजण अतुल यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी घरी पोहोचले आहेत.
गंभीर आजारपणातून बरे झाल्यावर अतुल यांनी झी नाट्य गौरव सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. त्यांचा कमबॅक पाहून अनेकांनी कौतुक केले होते. अतुल हे पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर आज अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त आले आहे. अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अतुल यांना अनेकजण श्रद्धांजली वाहत आहेत.