कोल्हापूर : विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती व परंपरा जपत महिलांचा सन्मान करूया असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.
जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशन व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित महाहादग्याचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. पूजा ऋतुराज पाटील, जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव प्रमुख उपस्थित होत्या.
सम्राटनगर येथील जिव्हेश्वर हॉलमध्ये पारंपरिक गीते व नृत्याने महाहादग्यास सुरुवात झाली. ‘कृष्णा झोपना, कान्हा झोपना’, एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू’, आभाळात पडलं जाईच फूल’, आज कोणवार बाई, आज कोणवार’, आडबाई आडवणी, बाजारातून आणला एकच आंबा’ अशी कितीतरी उत्साह भरणारी गीते गात महिलांनी फेर धरला. याबरोबरच हास्यविनोद करीत महिलांनी स्पॉट गेम्सचा आनंद लुटला.
आमदार जयश्री चंद्रकांत जाधव म्हणाल्या, आधुनिक काळात हादगा हा केवळ मुलीचा घरगुती कार्यक्रम राहिला नसून त्याला सामाजिक स्वरूप आले आहे. महाहादग्याचे आयोजन करून फाउंडेशनने महिलांच्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
महाहादगा आयोजित केल्याने आपली संस्कृती जपण्याबरोबरच भावी पिढीला हादग्याची माहिती मिळाली असे मत पूजा ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.
आपली परंपरा, सण उत्सव व संस्कृती याचे जतन व संवर्धनाच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी सांगितले.
महिलांनी आणलेली खिरापत ओळखण्याच्या कार्यक्रमानंतर ती खिरापत सगळ्यांना वाटण्यात आली. खिरापत ओळखण्याचा एक वेगळाच आनंद ही महिलांनी घेतला.
काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्मिता मांढरे, मेघना पंदारे, सुनीता हुंबे, चंदा बेलेकर, पुनम हवलदार, दिपाली घाटगे, शैलेजा टोपकर, राजश्री ढवळे, वैशाली पैठणकर, शिवानी सूर्यवंशी, विद्या निंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेचा निकाल असा :
मोठा गट – स्नेहल गावडे, प्रणाली इंगवले, पूजा केसरकर.
लहान गट : सौख्या हिरूगडे, प्रीती गोविंदगोपाल, शार्वी उगले, अर्शिता पाटील. ऋग्वेदा मोहिते, दिव्या गजबर, सुवंशिका जाधव, शिवस्वी पाटील.