रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.

 

 

रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

जगाने अनमोल रत्न गमावले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने गमावले आहे. भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे.अशी शोकमग्न प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला : देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ उद्योगपती  रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.