अजित पवार बारामतीमधूनच लढणार; महायुतीमध्ये २३५ जागांवर एकमत : प्रफुल पटेल

मुंबई : इंडिया आघाडीने माध्यमातून हरियाणामध्ये कॉंग्रेस येणार अशी अफवा पसरवली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार असे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले परंतु जमीनीवरील परिस्थिती काय होती ती आज लोकांसमोर आली आहे. हरियाणामध्ये जिलेबी खायची कुणावर वेळ आली आहे हे सिद्ध झाले आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना केला.

 

काश्मीर खोऱ्यातील विचार करता तिथे नॅशनल कॉन्फरन्स पार्टी अनेक वर्षे काम करत आहे. तिथे भाजप इतर पक्षांचे कमी अस्तित्व आहे आणि दुसर्‍या बाजूला जम्मूमध्ये भाजप एक नंबरवर आहे. कॉंग्रेसला ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या जीवावर मिळाल्या आहेत. स्वतःच्या जीवावर जागा मिळवता आलेल्या नाहीत. हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आले आहे. अनेक घटक नाराज आहेत हा जो प्रचार इंडिया आघाडीने केला होता हे फक्त माध्यमांना हाताशी धरून लोकांची दिशाभूल करत होते हे सिद्ध झाले आहे असा जोरदार प्रतिहल्ला प्रफुल पटेल यांनी केला आहे.

मागील दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि महायुतीच्या सरकारने देशात आणि राज्यात प्रगती करण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यात शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना अशा अनेक क्रांतीकारी योजनांमध्ये आतापर्यंत साडेसात हजार रुपये आमच्या बहिणींना त्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. हे कुणाला नाकारता येणार नाही असेही प्रफुल पटेल म्हणाले.

महायुतीमध्ये समन्वय आहे. विधानसभेसाठी जवळपास २३५ जागांवर आमचे एकमत झाले आहे. उरलेल्या ज्या जागा आहेत. त्यावर एक-दोन दिवसात बसून योग्य मार्ग काढणार आहोत. महायुतीमध्ये मतभेद आहेत असे विरोधकांकडून चित्र उभे करण्यात येत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. आऊटगोईंग आणि इनकमिंगचा जो विषय आहे. त्यामध्ये काही माणसे इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होत नाही. आणि प्रत्येक निवडणुकीत काही लोकं इकडेतिकडे म्हणजे या पक्षातून त्या पक्षात जात असतात. त्याचा अर्थ जनसामान्यांच्या मनात नाराजी आहे असा नाही. स्थानिक स्तरावर काही गणितं बिघडवण्यासाठी इकडेतिकडे जात असतात. पण आज हरियाणाचा निकाल आल्यानंतर आऊटगोईंग आणि इनकमिंग करणारे विचार करतील अशी खात्री प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.

लोकसभेच्यावेळी ईव्हीएम चांगली होती. मोदी यांचे मताधिक्य कमी झाले त्यावेळी ईव्हीएम चांगली होती आणि आता ईव्हीएम खराब आहे असे दिसू लागले आहे. काश्मीरमध्ये ईव्हीएम बिघाड होऊ शकला असता ना? परंतु असे काही नाही झाले. कधी कधी आपल्याला ही व्यवस्था बरोबर आहे असा विश्वास ठेवायला पाहिजे. जेव्हा विरोधक पराभूत होतात तेव्हा ‘अंगूर खट्टे है’ ही म्हण त्यांना लागू होते असा टोलाही प्रफुल पटेल यांनी लगावला.

आपल्या भल्यासाठी कोण काम करत आहे हे लोकांना आता समजले आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील एक वर्षात महायुतीने क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे नक्कीच प्रत्येक वर्गाला हे आमचं सरकार परत आले पाहिजे असे वाटत आहे असा विश्वासही प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्यांच्या मनात काहीच संभ्रम नाही. फक्त काही स्थानिक प्रश्न होते त्यावरून काही प्रश्न निर्माण झाले होते परंतु ते आता अजितदादा व आम्ही सगळे बोलणार आहोत तेव्हा हे प्रश्न सुटतील. निवडणूक कालावधीत प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही घडामोडी घडत असतात. आता फक्त आऊटगोईंग दिसतेय पण काही दिवसात इनकमिंग सुरू होणार आहे असेही प्रफुल पटेल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत अशी अधिकृत घोषणा पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना केली.