रास रसिया- २४ दांडिया महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, दीड लाख रूपयांच्या बक्षिसांचे वितरण

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स यांच्यावतीने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला तरूण – तरूणींबरोबरच अबालवृध्दांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. विविध गीतांच्या तालावर मनसोक्त दांडिया खेळत युवा वर्ग आणि महिलांसह सुमारे ११०० सहभागीने रास रसिया हा महोत्सव यशस्वी केला. विविध वयोगटातील विजेत्यांना सुमारे दीड लाख रूपयांची बक्षिसे देण्यात आली.


रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स यांच्यावतीने कोल्हापुरात रास रसिया- २४ या दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला सर्वच स्तरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. वृषाली हॉटेल मध्ये झालेल्या या महोत्सवाचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक, रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, रोटेरियन उत्कर्षा पाटील, कृष्णराज महाडिक, सत्यजीत कदम, स्वरूप कदम, नितीन आगरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीची आरती करून सुरवात झाली.
मुलांसाठी वयोगटानुसार बेस्ट किडस, बेस्ट ड्रेस किडस बॉय, बेस्ट ड्रेस किडस गर्ल, बेस्ट किडस ग्रुप, बेस्ट दांडिया मेल, बेस्ट दांडिया फिमेल, बेस्ट गरबा फिमेल, बेस्ट ड्रेस मेल, बेस्ट ड्रेस फिमेल, बेस्ट कपल, बेस्ट रास रसिया किंग, बेस्ट रास रसिया क्वीन, बेस्ट ग्रुप, बेस्ट कपल सिनिअर सिटिझन अशा विविध गटात आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होवून, स्पर्धकांनी दांडियाच्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, या महोत्सवात रंग भरला. तरूणाईसह लहान मुले आणि अनेक कुटूंबही या दांडियामध्ये उत्साहात सहभागी झाली होती. भान विसरून दांडिया खेळत सर्वांनीच या खेळाचा मनमुराद आनंद लुटला. हॉलमध्ये रंगीबेरंगी प्रकाश योजना, भव्य ऑर्केस्ट्रा, डिजेच्या तालावर डोलणारा मंच आणि स्टेजची केलेली आकर्षक सजावट अशा वातावरणात अबालवृध्दांनी रोजच्या दिनक्रमातून आणि धावपळीतून बाहेर पडून, एक सायंकाळ अविस्मरणीय बनवली.

दांडियाच्या अखेरच्या सत्रात बक्षिस वितरण झाले. स्पर्धेदरम्यान काढलेल्या पहिल्या लकी ड्रॉ मध्ये श्री अंबाबाईची मानाची साडी देण्यात आली. दुसर्‍या लकी ड्रॉ विजेत्यांना काजवे फर्निचरकडून खुर्ची देण्यात आली. रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, प्रोजेक्ट चेअरमन अकेत शहा, सचिव बी एस शिंपुगडे, उत्कर्षा पाटील, प्रेरणा जाधव, गीता कदम, जिग्ना वसा, सचिन लाड, अनिकेत अष्टेकर यांच्या उपस्थितीत विविध वयोगटातील विजेत्यांना एकूण दीड लाख रूपयांची पारितोषिके देण्यात आली. सुत्रसंचालन सुवर्णा गांधी यांनी केले. या सोहळ्यासाठी तीन दिवस सर्वांची पूर्व तयारी सौ. अरूंधती महाडिक यांनी करवून घेतल्यामुळेच हा कार्यक्रम उत्साहात, जल्लोषात पार पडला. यावेळी रोटरीचे पदाधिकारी आणि प्रायोजक उपस्थित होते.