खलनायकी प्रवृत्तीला जनता कधीही थारा देणार नाही : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : आपला विरोधक तुरुंगातच गेला पाहिजे, त्याचं कुटुंब तुरुंगात गेलं पाहिजे, मगच आपण आमदार होऊ या भावनेने पछाडलेले व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आहे. अशा नतद्रष्ट, खलनायक प्रवृत्तीच्या व्यक्तीला कागलची जनता लोकप्रतिनिधी करणार का? असा सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. वंदूर ता. कागल येथे विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होतेत.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. यावेळी गोकुळ संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, रमेश तोडकर, धनराज घाटगे, सरपंच मालुबाई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, तुम्ही विरोधकाचे चरित्र तपासून पहा. संजय गांधी निराधारच्या तक्रारी त्यांनी केल्या. अनेक निराधार माता- भगिनींच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम त्यांनी केलं. तसेच, सिद्धनेर्लीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दलितांना दिलेल्या जमिनी त्यांनी काढून घेतल्या. त्यासाठी दहा ते वीस कुटुंब रस्त्यावर येऊन उपोषण करत आहेत. एवढी प्रॉपर्टी, जमिनी असताना हा अट्टाहास कशासाठी चालू आहे? असा त्यांनी सवाल केला. शंभर वर्षांपूर्वी दलितांना दिलेली जमीन त्यांनी काढून घेतली. त्यामुळे आपण कोणाच्या हातात सत्ता देणार आहोत? म्हणून अशा खलनायकी प्रवृत्तीच्या विरोधात ठाम उभे रहा. मी कधी जात- धर्म बघितला नाही की पक्ष -पार्टी बघितली नाही. येणारा माणूस हा हसत कसा जाईल, असं आयुष्यभर मी बघत राहिलो. सत्तेचा उपयोग तुमच्या कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी करीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी धनराज घाटगे, सरपंच मालुबाई कांबळे, युवराज कांबळे, एम. एस. कांबळे, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.