कसबा बावडा: राजाराम कारखान्याची सन 2023 -24 ची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू होऊन सभेचे कामकाज खेळीमेळीत संपन्न झाले. सभेमधील सर्व विषयासह ऐनवेळीच्या विषयांना उत्स्फूर्त मंजुरी देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह अभिवादन करून सभेस प्रारंभ झाला. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने वेतन मंडळातील सर्व रक्कम मिळालेबदल महादेव महाडिक यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर व्हा. चेअरमन गोविंदा चौगुले यांनी अहवाल सालात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. राजाराम कारखान्याच्या या सभेत उत्स्फूर्तपणे सभासदांनी उपस्थिती दर्शवली. प्रास्ताविक व स्वागतामध्ये कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी कारखाना महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे सुरू आहे, असे सांगितले. चेअरमन यांनी शासनाकडे खालील प्रमाणे मागण्या करीत असल्याचे नमूद केले.
1. केंद्र शासनाने साखरेचा किमान विक्री दर रुपये 3100/ प्रति क्विंटल वरून रुपये3800/प्रति विंटल इतका करावा.
2. केंद्र शासनाने इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी दिर्घ मुदतीचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 20% पर्यंत वाढवावे व इथेनॉल दरामध्ये देखील वाढ करावी.
3. केंद्र शासनाने जागतिक बाजारपेठेतील साखर उत्पादनाचा अंदाज विचारात घेता साखर निर्यातीस ओजिएल खाली परवानगी द्यावी.
4. साखरेचे पॅकिंग जूट बॅग मध्ये करण्याबाबतची अट शिथिल करण्याकरिता राज्य शासनामार्फत केंद्र शासनास शिफारस करण्यात यावी.
5. साखर मालतारण व मध्यम मुद्दत कर्जाची व्याजदर 7% ते 8% करावेत
कार्यकारी संचालक चिटणीस यांनी संपूर्ण विषय पत्रिकेचे वाचन केले. त्या सभासदांनी नोटीसी वरील व ऐनवेळीचे अशा सर्व विषयांना सर्वानुमती मंजुरी दिली. सभासदांनी विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे सभेमध्ये स्पष्टीकरणासह सविस्तरपणे वाचून दाखवली. कारखान्याची कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना कसबा बावड्याच्या काही विघ्न संतोषी लोकांनी घरी जात असताना वाटेत अडवून अमानुषपणे मारहाण करून त्यांना जखमी केले या घटनेचा उपस्थितीत सर्व उत्पादक सभासदांनी निषेधाचा ठराव या सभेत नोंदवला. सदर घटनेमुळे कारखान्याचे सभासद अधिकारी व कर्मचारी यांचे मनामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. आभार प्रदर्शन कारखान्याची संचालक शिवाजी रामा पाटील यांनी केले आणि वंदे मातरम होऊन सभेची सांगता झाली.