सहकार भारतीचा ‘कै.आण्णासाहेब गोडबोले’ पुरस्कार आमदार प्रकाश आवाडे यांना प्रदान

कुंभोज (विनोद शिंगे)

सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल सहकार भारती यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा सर्वोच्च ‘कै. अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार’ आमदार प्रकाश आवाडे यांना प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे संपन्न सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे चौदावे त्रैवार्षिक अधिवेशनात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन 1978 मध्ये ’सहकार भारती’ या स्वयंसेवी संघटनेची स्थापना झाली. तेव्हापासून गेली 46 वर्षे या संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू असून सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने होणार्‍या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष ‘कै. अण्णासाहेब गोडबोले’ यांच्या नावाने सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणार्‍या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांची निवड करण्यात आली होती.

याप्रसंगी केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, संघटनमंत्री संजय पाचपोर, सहकार भारतीचे संस्थापक सदस्य तथा रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शशीताई अहिरे, महामंत्री विवेक जुगादे, सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, कार्यालय प्रमुख श्रीकांत पटवर्धन, सहसंघटनप्रमुख अ‍ॅड. जवाहर छाबडा, जिल्हा महामंत्री धोंडीराम पागडे, महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख सौ. वैशाली आवाडे, अधिवेशन प्रमुख अ‍ॅड. रविकाका बोरावके, सहप्रमुख अभिनाथ शिंदे आदींसह सहकार भारतीचे राज्यभरातील हजारो सक्रीय कार्यकर्ते उपस्थित होते.