कोल्हापूर : सोमनाथ जांभळे
भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या तर्फे दरवर्षी राष्ट्रीय कला उत्सव ही स्पर्धा संपन्न होते. तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना आपली कला दाखवण्यास एक मोठी संधी प्रत्येक मुलाला असते. परंतु या स्पर्धेसंदर्भातील पत्र जिल्ह्यातून तालुका स्तरापर्यंत आणि तालुक्यातून प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कौशल्य असणारे विद्यार्थी या संधीस मुकत आहेत. यासंदर्भात कोल्हापूर DIET College च्या अधिकाऱ्यांशी काही पालकांनी चौकशी केली असता अरेरावीची उत्तरे आणि कारवाईची धमकी देण्यात आली.
यावर्षीची ही स्पर्धा तालुकास्तरावर न होता सरळ जिल्हास्तरावर होणार असल्याचे पत्र आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी मिळाले असून स्पर्धा येत्या दोन दिवसात म्हणजे 24 सप्टेंबर रोजी उरकण्यात येणार आहेत. यामुळे वर्षभर जे विद्यार्थी या स्पर्धेसाठी तयारी करुन प्रतीक्षा करीत आहेत त्यांना या स्पर्धेची काहीच माहिती नाही. ते या स्पर्धेपासून मुकणार आहेत. माहितीप्रमाणे गडहिंग्लज, आजरा, चंदगड, या तालुक्याना याबद्दल कोणतीही सूचना अद्याप प्राप्त झालेली नाही आहे. आणि या प्रकारास केवळ कोल्हापूर जिल्हा शिक्षण विभागच जबाबदार आहे,असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
गेल्याच वर्षी दिल्ली येथे झालेल्या 2023-24 कला उत्सव स्पर्धेत गडहिंग्लज तालुक्यातील एका विद्यार्थ्याने आपल्याच जिल्ह्याचे आणि राज्याचे प्रतिनिधित्व करुन सिल्वर मेडल पटकावले होते परंतु शिक्षण विभागाला याबद्दलची कोणतीही माहिती नसल्याचे आढळून आले.
ही अतिशय गंभीर बाब असून खूप मोठी शोकांतिका आहे. याची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली गेली पाहिजे. शिक्षण अधिकारी आंबेसर यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवान कोईगडे, निलेश चव्हाण दत्तात्रय मेटील, सर्जेराव काळुगडे, दीपक पाटील, दत्तात्रय दिक्षित,अमर पाटील, यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.