आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली : आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबरला त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आतिशी यांची एकमताने निवड मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली. २१ सप्टेंबर शनिवार या दिवशी आतिशी यांना उपराज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. आतिशी या आपच्या आमदार आहेत. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदियायांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १३ सप्टेंबर २०२४ ला सुप्रीम कोर्टाने जामीन दिला आणि तब्बल तीन महिन्यांनी केजरीवाल तुरुंगाबाहेर आले. केजरीवाल बाहेर येताच त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि तेव्हा ते म्हणाले जेल की सलाखे केजरीवाल के हौसलों को कम नही कर सकते. १५ सप्टेंबरला त्यांनी दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या कार्यालया बाहेर ते म्हणाले की, येत्या २ दिवसात मी मंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. त्यावेळी जमावाने नाही चा नारा लावला. पण केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी पुढचा चेहरा कुणाचा असेल हा प्रश्न निर्माण झाला.

आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्या आतिशी यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आला. आतिशी या २०१९ ला पक्षात सहभागी झाल्या. आतिशी यांना पूर्व दिल्लीतून भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या विरोधात उमेदवारी दिली तेव्हा त्यांचा पराभव झाला. पण त्याच्या पुढच्याच वर्षी कालकाजी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली आणि तेव्हा त्या विजयी झाल्या. तीन वर्षांनंतर मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर त्या दिल्ली सरकारमध्ये मंत्री बनल्या. आजच आतिशी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आतीशी या कामी वयाच्या महिला मुख्यमंत्री बनल्या तसेच त्या तिसऱ्या महीला मुख्यमंत्री बनल्या आहेत.