कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील १४ गावांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी या निधीसाठी विशेष प्रयत्न केला होता. या गावांमध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निगवे खालसा, कळंबे तर्फ ठाणे, सरनोबतवाडी, सांगवडे, वळीवडे, चिंचवाड, उचगाव, हलसवडे, तामगाव,नेर्ली, पाचगाव या गावांचा समावेश आहे.
ग्रामविकास विभागाच्या या विशेष निधीतून या गावांमधील स्मशानभूमी परिसर विकास आणि पथदिव्यांची कामे केली जाणार आहेत. यामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निगवे खालसा आणि कळंबे तर्फे ठाणे येथील स्मशानभूमी परिसर विकासासाठी प्रत्येकी २० लाख रुपये, सरनोबतवाडी, पाचगाव, नेर्ली , तामगाव, उचगाव, वळीवडे, चिंचवाड, हलसवडे आणि सांगवडे स्मशानभूमी परिसर विकासासाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच वळीवडे आणि चिंचवाड मधील पथदिव्यांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीची दुरवस्था होती.
स्वच्छतेचा अभाव आणि इतर गैरसोयींमुळे अग्निसंस्कार करणे अडचणीचे बनले होते. त्यामुळे नाईलाजाने अनेक नागरिकांना कोल्हापूर शहरातील स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागत होता. ही बाब ध्यानात घेऊन माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे हा निधी प्राप्त झाला आहे. तसेच ज्या गावांमध्ये पथदिव्यांची सोय नव्हती त्या गावांमध्ये पथदिवे उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
प्राप्त निधीतून स्मशानभूमीच्या परिसर विकासासोबत विस्तारीकरण आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येईल. हा निधी उपलब्ध केल्याबद्दल माजी आमदार महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत. लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला आहे.