मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू : मुलगा,भाऊ जखमी

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
केखले ( ता.पन्हाळा ) येथे ऊसातील वैरण काढत असताना अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात संभाजी बाबू कोलूले पाटील (वय६५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलगा युवराज आणि भाऊ लक्ष्मण हे या हल्यात किरकोळ जखमी झाले त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

 

ऊसातील वैरण काढण्यासाठी संभाजी कोलूले शेतकरी आज सोमवारी दि.१६ रोजी सकाळी गावातील पाझर तलावाशेजारी असणाऱ्या तराळकी नावाच्या शेतात स्वतःच्या उसाच्या शेतातील पाल्याची वैरण काढत असताना अचानक आलेल्या मधमाशांच्या थव्याने संभाजी कोलुले यांचेवर हल्ला चढवला या मधमाशांच्या हल्ल्यात मधमाशांनी कोलूले यांच्या तोंडावर गळ्यावर हातापायावर प्रचंड चावा घेतला,संभाजी कोलूले यांना मधमाशांनी चावा घेतल्याने होत असलेल्या वेदनामुळे आक्रोश करत ते ऊसाबाहेर आले, तरीसुद्धा मधमाश्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नव्हता.मधमाश्यांच्या तावडीतून त्यांची सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले त्यांचा मुलगा युवराज संभाजी कोलूले आणि भाऊ लक्ष्मण बाबू कोलूले यांना देखील काही मधमाशांनी चावा घेतला.

मधमाश्यांच्या हल्ल्याचे शिकार बनलेले संभाजी कोलूले हे गंभीर जखमी झाल्यामुळे बेशुद्ध पडले होते. त्यांना घोंगड्यात लपेटून उपचारासाठी कोडोली येथील उपजिल्हा रूग्णालयात नेले असताना उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.संभाजी कोलूले हे वारणा दुध संघाचे निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली सुन, नातवंडे असा परिवार आहे.