कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील
“बहुजन समाज शिकू लागला, विचार करू लागला, तसा बामणीकावा त्यांच्या लक्षात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना बदनाम करणारी हीच मंडळी होती आणि आज त्यांचेच नाव घेऊन स्वतःला हिंदू म्हणवून पोलिसी पाहऱ्यात बहादुरी गाजवणारे हेच आहेत. आपली लबाडी उघड केली जाते म्हणून, चिडून ते आता बहुजन विचारवंतांना टार्गेट करत आहेत. वैचारिक वाद घालण्याची कुवत नसल्यामुळे हिंदुवर अन्याय, हिंदुवर अन्याय असे ते ओरडत राहतात.बहुजनांना लुबाडण्यासाठी यांनी पुराणे तयार केली. त्यांची चिरफाड, संत तुकाराम, महात्मा फुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार यांनी केलेली आहे. आता ते काम ज्ञानेश महाराव सारखे विचारवंत करत आहेत. त्यांनी मांडलेला एकही मुद्दा धर्मांध लोकांना खोडून काढता येत नाही, म्हणून ते त्यांच्या विरोधात कोल्हेकुई करत आहेत. त्यांच्या कोल्हेकुईला बहुजनांनी फसू नये.” असे आवाहन अनिल चव्हाण यांनी केले.
कॉम्रेड चंद्रकांत यादव आपल्या भाषणात म्हणाले,”विचारांचा मुकाबला विचाराने करा, पण ती कुवत नसल्यामुळे धर्माच्या आडून टीका केली जाते. वैचारिक वाद न घालता बहुजन विचारवंतांना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल,”
सभेच्या अध्यक्षस्थानी आनंदराव चौगुले होते. रवींद्र चव्हाण यांनी जेम्स लेन आणि बाबा पुरंदरे यांच्या कारवायांची माहिती दिली.जयंत मिठारी यांनी बहुजन समाजातील तरुणांना फुले शाहू आंबेडकर वाचण्याचे आवाहन केले.यानंतर ज्ञानेश महाराव यांचे व्याख्यान ऐकवण्यात आले. यावेळी राजेंद्र खद्रे, जयंत मिठारी, अमर जाधव,… इत्यादींनी आपली मते मांडली. यानंतर, छत्रपती शिवरायांचा पुतळा करताना पैसे खाल्लेल्यांची नावे जाहीर करावीत, धर्मांधांच्या गुंडगिरीला आळा घालावा आणि “बहुजन विचारवंतांना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल” असा ठराव एक मताने करण्यात आले.
कार्यक्रमासाठी चंद्रकांत सूर्यवंशी मिस्त्री,विलासराव पोवार, मीना चव्हाण, छाया पोवार, एडवोकेट अजित चव्हाण, बबन मोरे, संजू निकम, संजय चौगुले, सुनंदा चव्हाण, संजय साळोखे, ऋषिकेश मिठारी ,डॉक्टर नारायण शिंदे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.